Pakistan – पाकिस्तानात सुरक्षा दलांनी पंजाब प्रांतात विविध दहशतवादी संघटनांशी संबंधित १६ दहशतवाद्यांना अटक केली असून पंजाबमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये या दहशतवाद्यांना अटक केली गेली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा दलांनी गेल्या आठवड्याभरात गोपनीय माहितीच्या आधारे तब्बल ११३ ठिकाणी कारवाई केली. त्यात या दहशतवाद्यांना अटक केली गेली, असे पंजाब प्रांताच्या काउंटर टेरेरिझम डिपार्टमेंटच्या प्रवक्त्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेले दहशतवादी तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान, अल-कायदा आणि दाईश (इसिस) या संघटनांचे सदस्य आहेत. इतक्या मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना अटक झाल्यामुळे घातपाताचा मोठा कट उघडकीस आणला गेला आहे, असेही या प्रवक्त्याने सांगितले. Terrorists याशिवाय फितना-अल-ख्वारजी गटाचा एक आत्मघातकी बॉम्बर आणि सुरक्षा विषयक संस्थांवरील हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या मोईन खान नावाच्या अन्य दहशतवाद्यालाही सरगोधा येथून अटक करण्यात आली. दहशतवाद्यांच्या ताब्यातून शस्त्रे, ५ किलोपेक्षा जास्त स्फोटके, १ डेटोनेटर, २५ फूट सेफ्टी फ्यूज वायर आणि एक आत्मघाती जॅकेट जप्त करण्यात आले. दहशतवाद्यांनी पोलीस चौक्यांवर हल्ला करण्याची योजनाही आखली होती. या संदर्भात या दहशतवाद्यांकडे अधिक चौकशी केली जाते आहे.