IAS Officers | Indian Administrative Service : गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी बनावट अपंगत्व प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप केला जातोय. हे प्रकरण ताजं असातना आता आणखी एका आयपीएस अधिकाऱ्याने अशाचपद्धतीने नोकरी मिळवण्याचा प्रकार समोर आला आहे. अभिषेक सिंह असं त्याच नाव असून, त्यांनी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होऊ लागला आहे. 2011 मधील आयएएस अधिकारी असलेल्या अभिषेक सिंह यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये राजीनामा दिला होता. अभिषेक सिंह यांची संघ लोक सेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत अपंग कोट्यातून निवड झाली होती. त्यांनी लोकोमोटिव डिसऑर्डर असल्याचे म्हटले होते. अभिषेक यांनी एक्टिंग करिअरसाठी आयएएसचा राजीनामा दिला. दरम्यान, एक IAS अधिकारी बनण्यासाठी नेमकं काय करावं लागत आणि त्यांना कोणत्या सुविधा मिळतात यावर एक नजर टाकुयात…. तुम्हाला देखील आयएएस अधिकारी बनायचे असेल त्यासाठी खूप सारे आव्हाने पार करावी लागतात. एक आयएएस अधिकारी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये विविध पदांवर काम करतो. आयएएस अधिकाऱ्यामध्ये समाज, समुदाय आणि व्यक्तींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता असते. जबाबदाऱ्या आणि अधिकारामुळे हे सर्वात प्रतिष्ठित पद मानले जाते. दरवर्षी लाखो लोक आयएएस अधिकारी होण्यासाठी परीक्षा देतात. आणि त्यातून काही ठराविकच लोक या पदापर्यंत पोहोचतात. त्यामुळे यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आयएएस अधिकाऱ्याचे प्रशिक्षण कसे असते – जे UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करतात त्यांना प्रशिक्षणासाठी ‘लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी’ (LBSNAA) येथे पाठवले जाते. ही अकादमी उत्तराखंड येथे आहे. याठिकाणी प्रशिक्षणार्थी IAS दोन वर्षांसाठी प्रशिक्षण घेतात. या काळात मूळ वेतनही मिळते. LBSNAA मध्ये प्रशिक्षणार्थी IAS अधिकाऱ्याचे दैनंदिन वेळापत्रक देखील असते, आणि त्यानुसार त्याचे काम चालते. – सकाळी 5:30 वाजता उठणे – सकाळी 6 ते 7 या वेळेत व्यायाम/ घोडेस्वारी प्रशिक्षण – सकाळी 7 ते 9 मोकळा वेळ – व्याख्याने, क्रीडा आणि इतर अभ्यासेतर क्रियाकलाप सकाळी 9:30 पासून सुरु होतात. प्रशिक्षणादरम्यान भारत दर्शन – प्रशिक्षणादरम्यान देश समजून घेण्यासाठी आयएएस अधिकाऱ्याला भारत दर्शन घडवले जाते. याशिवाय आजूबाजूच्या ग्रामीण भागातही ट्रेकिंग केले जाते. भविष्यातील अधिकारी प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यायला शिकतील हा त्याचा उद्देश आहे. प्रशिक्षणादरम्यान विविध कौशल्ये शिकवली जातात. जे पुढे जाऊन अधिकाऱ्यासाठी खूप महत्वाचे ठरतात. प्रशिक्षणानंतर पोस्टिंग कशी होते – दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर आयएएसला त्यांच्या कॅडरमध्ये पाठवले जाते. जेथे विशिष्ट क्षेत्र किंवा विभागाचे प्रशासन आढळते. आयएएस अधिकाऱ्याची पहिली पोस्टिंग उपविभागीय दंडाधिकारी म्हणून असते. यानंतर जिल्हा दंडाधिकारी आणि उपायुक्त या पदांवर पदोन्नती उपलब्ध आहे. आयएएस अधिकारी केंद्र आणि राज्य सरकारच्या सचिवालयांपासून सरकारी कंपन्यांपर्यंत विविध पदांवर काम करतात. आयएएस अधिकाऱ्याचा दिवसाची सुरुवात कशी होते – नियुक्तीनंतर, आयएएस अधिकाऱ्याचा सामान्य दिवस सकाळी 9 वाजता सुरू होतो आणि कामाची वेळ रात्री 9 वाजेपर्यंत असते. यामध्ये दैनंदिन प्रगती अहवाल वाचणे, विभाग किंवा जिल्ह्याच्या कामावर लक्ष ठेवणे, विविध बैठकांना उपस्थित राहणे इत्यादींचा समावेश होतो. रात्री उशिरापर्यंत हे उपक्रम सुरू होते. आयएएस अधिकाऱ्याची शक्ती काय असते – जिल्हा दंडाधिकारी म्हणून आयएएस अधिक खूपच शक्तिशाली असतो. ते जिल्याचे प्रमुख असतात त्यामुळेच त्यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व विभागाच्या जबाबदाऱ्या असतात. जिल्हा दंडाधिकारी या नात्याने ते पोलीस विभाग आणि इतर विभागांचेही प्रमुख आहेत. आयएएस अधिकाऱ्याला फॉर्मल, प्रोफेशनल ड्रेस घालावे लागते. सुमारे 300 कायद्यांद्वारे आयएएस अधिकाऱ्याच्या शक्तीची व्याख्या करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था राखायचे काम देखील त्यांच्याकडे असते, आणि म्हणूनच त्यांना जिल्ह्याचे प्रमुख म्हणून देखील संबोधले जाते. तसेच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याचे नियंत्रण करण्याचे काम देखील त्यांच्याकडे असते. वेतन आणि सुविधा काय मिळतात – सातव्या वेतन आयोगानुसार आयएएस अधिकाऱ्याचे मूळ वेतन 56100 रुपये आहे. आयएएस अधिकाऱ्यांसाठी एकूण 18 वेतन स्तर आहेत. जर आयएएस अधिकाऱ्याच्या पगारात सर्व भत्ते समाविष्ट केले तर त्याचा संपूर्ण मासिक पगार 1,50,000 रुपये येतो. आयएएस अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा कोणत्या – – अनुदानावर सरकारी घरे तसेच जिल्हास्तरीय पोस्टिंगमध्ये आयएएस अधिकाऱ्यांना उत्तम निवास मिळतो. – घरगुती कामात मदत करण्यासाठी स्वयंपाकी, माळी इ. लोक हाताखाली असतात. – आवश्यकतेनुसार सुरक्षा कवच. – जिल्हा आणि राज्यस्तरीय पोस्टिंगमध्ये शासकीय वाहने उपलब्ध आहेत. – मोबाईल, इंटरनेट आणि टेलिफोन बिलांचा खर्च कव्हर केला जातो. – ड्युटी दरम्यान सरकारी गेस्ट हाऊस आणि बंगले मोफत राहण्यासाठी उपलब्ध आहेत. – आयएएस अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतरही आजीवन पेन्शन मिळते. अभ्यासासाठी दोन वर्षांची रजा देखील मिळते – आयएएस झाल्यानंतरही कोणाला शिक्षण घ्यायचे असेल तर तो भारतात किंवा परदेशात कोणत्याही ठिकाणी प्रवेश घेऊ शकतो. सरकार आयएएस अधिकाऱ्याला अभ्यासासाठी दोन वर्षांपर्यंत सुट्टी देते. या काळात पगारही मिळतो.