बांगलादेशातील हिंसाचारात 150 जण ठार; देशभर पाळण्यात येणार दुखवटा

ढाका : बांगलादेशात अलिकडेच झालेल्या देशव्यापी हिंसक निदर्शनांमध्ये किमान 150 जण ठार झाले असल्याचे बांगलादेश सरकारने म्हटले आहे. सरकारी नोकऱ्यामधील आरक्षणाला विरोध करण्यासाठी विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सरकारने कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण केले होते. पंतप्रधान शेख हसिना आणि त्यांच्या सरकारविरोधात विद्यापिठे आणि महाविद्यालयांमध्ये सुरू झालेले हे हिंसक आंदोलन अल्पावधीतच देशभरात पसरले होते.
अशांततेमुळे पोलिसांसह हजारो लोक जखमी झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर सरकारी संस्थांचे नुकसान झाले आहे. या आंदोलनात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी उद्या (मंगळवारी) देशभर दुखवटा पाळला जाणार आहे, असे सरकारने म्हटले आहे. मृतांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी नागरिकांना काळ्या फिती बांधण्यास सांगण्यात आले आहे, असे कॅबिनेट सचिव महबूब हुसैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पंतप्रधान कार्यालयात हसिना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहीती दिली. देशभरातील मशिदी, मंदिरे, पॅगोडा आणि चर्च यांना देखील मृतांच्या आत्म्यासाठी आणि जखमी लोकांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर परिस्थितीचा आढावा घेतला असून लष्कर आणि निमलष्करी दलांनी राजधानी ढाक्याच्या प्रमुख रस्त्यांवर गस्त घालून परिस्थितीची पहाण देखील केली आहे.





