पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला 15 वर्षे सक्तमजुरी 

विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांचा निकाल : पीडितेला 50 हजार नुकसानभरपाई देण्याच राज्य सरकारला आदेश 

पुणे: पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला 15 वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. दरम्यान पीडितेला 50 हजार रुपये नुकसानभरपाई राज्य सरकारने द्यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साईनगर भागात 25 एप्रिल 2016 आणि त्यापूर्वीच्या सात वर्षांच्या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादीच्या वेळी पीडितेचे वय 19 होते. तर वडिलांचे वय 46 होते. पीडित आठवीत असल्यापासून शरीर स्पर्श, स्त्री-पुरूष संबंधाचे अश्‍लील फोटो दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य वडिल करत असत. त्यानंतर ती अल्पवयीन आहे, हे माहित असतानाही संमतीशिवाय तिच्याबरोबर वेळीवेळी शरीर संबंध ठेवले. त्यातून दहावीत असताना ती दोन महिन्याची गरोदर राहिली. गर्भपाताच्या गोळ्या देऊन त्याने तिचा गर्भपात केला. याबाबत आई, भावाला सांगितल्यास, त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुरेश गवळी यांनी काम पाहिले. त्यांनी 11 साक्षीदार तपासले. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या लता सोनवणे, पीडितेची मैत्रीण यांची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी हेडकॉन्स्टेबल संजय जाधव आणि सुमित जगझाप यांनी मदत केली. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. गवळी यांनी केली. यावर सुनावणी करत न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 आणि 4 नुसार 15 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड, भारतीय दंड संहिता कलम 376 (2) (बलात्कार) नुसार 15 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड, भादवी कलम 354 (विनयभंग) नुसार 2 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावाली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.