पुणे जिल्हा | शिरूरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा १५ ते २० जणांना चावा

शिरूर, (प्रतिनिधी) – शिरूर शहरात पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून दोन वर्षांच्या चिमुरड्यासह १५ ते २० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पिसाळलेल्या कुत्र्यांनी १५ ते २० जणांना चावा घेतला असून, सातजणांवर शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय येथे पाठवण्यात आले असल्याचे शिरुर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी संगितले. यामुळे शिरूर शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
साई अमोल वाईकर (जय ६), जवेरिया नदीम काकर ( वय ६), प्रिय हनिफ शेख (वय २), मानसी रमेश इरस्ने (वय १४), अलमस सादीक शेख, मंगेश सोन्याबापू घनवट, एजान नसीम राजे या सात जणांवर शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेण्यात येऊन ससून रुग्णालय, पुणे येथे पाठवण्यात आले आहे. शहरातील होलारआळी, सय्यदबाबानगर, साईनगर परिसरात दि. १५ रोजी सांयकाळच्या दरम्यान दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस घातला.
या भागात सायंकाळची वेळ असल्याने नळाला पाणी आल्याने महिला नळावर, तर या परिसरात असणारी लहान मुले रस्त्यांवर गल्लीमध्ये खेळत होती. रस्त्यांवर जाणारे नागरीक यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला करून हातावर, पायावर, मांडीला, कानाला, पाठीला चावा घेऊन जखमी केले.
नंतर काही जखमी खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले, तर सातजण शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल झाले, येथे त्यांना रेबीज लस देण्यात आली. कुत्रे पिसाळलेले असतील तर त्यासाठी वेगळी लस सुविधा शहर ग्रामीण रुग्णालयात नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुणालयात पाठवण्यात आले आहे.
आम्हाला वाचवा; नागरिकांचे नगर परिषदेला साकडे
आजच्या या मोकाट कुत्र्यांमध्ये एका कुत्र्याला नागरिकांनी जायबंदी केले असून, एक कुत्रा शहरात मोकाट फिरत असल्याने नागरिकांनी सावध राहावे. नगरपरिषदेच्या वतीने पुन्हा एकदा या मोकाट कुत्र्यांविषयी कार्यवाही करणे गरजेचे आहे व शहरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांपासून वाचवावे, असे साकडे नगरपरिषदेला नागरिकांनी घातले आहे.





