तुकोबारायांच्या पालखी रथासाठी पिंपरीच्या आमदाराकडून 15 किलो चांदी दान

पिंपरी – करोनाच्या महामारीमुळे 2 वर्षाच्या कालखंडानंतर यंदा श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाच्या मखर, सिंहासन आणि पादुकांसाठी 15 किलो चांदी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडून अर्पण करण्यात आली आहे.
श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे, पालखी सोहळ्याचे प्रमुख व संस्थानचे विश्वस्त ह.भ.प.माणिक महाराज मोरे, ह.भ.प.संतोष महाराज मोरे, ह.भ.प संजय महाराज मोरे, ह.भ.प मधुकर महाराज मोरे यांच्याकडे 15 किलो चांदी सुपूर्द करण्यात आली.
या चांदीपासून पालखी सोहळ्याच्या पादुका, सिंहासन, मखर, व अभिषेकासाठी लागणारी परात बनविण्यात येणार आहे. याप्रसंगी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त यांच्या सोबत शेखर कुटे, गुलाब कुटे, रमेश बापू लांडगे, अनिरुद्ध मोरे, संजय ढमाले, सतीश लांडगे, संजय औसरमल, शशिकांत घुले, संदीप चिंचवडे, नीता ढमाले, सचिन वाल्हेकर व सिध्दार्थ बनसोडे उपस्थित होते.






