पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 15 जण जखमी; मलकापुरमधील घटना

कराड (प्रतिनिधी) : मलकापूर (ता. कराड) येथील आगाशिवनगर (लाहोटीनगर) परिसरात राहणाऱ्या नागरिकांवर गुरुवारी पिसाळलेल्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये तब्बल पंधरा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मलकापूर हद्दीतील आगाशिवनगर (लाहोटीनगर) हद्दीत गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काही नागरिक घरासमोर बसले असताना त्याठिकाणी अचानक आलेल्या पिसाळळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ला केला. यामध्ये दहा ते पंधरा जण जखमी झाले आहेत. कुत्र्याने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये एकाच गोंधळ उडाला.
या घटनेची माहिती मिळताच मनसेचे तालुकाप्रमुख दादा शिंगण यांनी कार्यकर्त्यांसह तात्काळ घटनास्थळी येत जखमी झालेल्या महिला आणि पुरुषांना येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यामुळे मलकापुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत नागरिकांमध्ये संताप आहे. कराड आणि मलकापूर नगरपालिका प्रशासनाने एकत्रितपणे पिसाळलेल्या कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करावा. अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे दादा शिंगण यांनी दिला आहे.





