Cabinet Decision: रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील भातान गावातील १५ एकर शासकीय जमीन अॅमिटी विद्यापीठाच्या विस्तारासाठी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अॅमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या ‘रितनंद बलवेद एज्युकेशन फाउंडेशन’कडून नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी व शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी अतिरिक्त जागेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार विशेष बाब म्हणून ही जमीन देण्यास मान्यता देण्यात आली. (Cabinet Decision) सध्या विद्यापीठात १८ शाखांमधून शैक्षणिक अभ्यासक्रम राबविले जात असून पाच हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्या जागेवर शैक्षणिक संकुल, क्रीडांगणे, वसतिगृहे, ग्रंथालय तसेच प्रयोगशाळांची उभारणी करण्यात येणार आहे. ही जमीन निर्धारित प्रीमियम भरल्यानंतर ‘क्लास-२’ भोगवटा अटींवर शैक्षणिक उद्देशांसाठी देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले.