तळेगाव दाभाडे -मावळ तालुक्यात जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुंबई पुण्याच्या धनिकांनी सेकंड होम म्हणून निसर्गरम्य मावळ तालुक्याला पसंती दिली आहे. त्यामुळे वाढलेल्या जमिनीच्या खरेदी विक्रीतून तळेगाव येथील दुय्यम निबंधक वडगाव-2 कार्यालयाकडून गेल्या वषभरात नोंदविलेल्या दस्तातून शासनाला तब्बल 146 कोटी 29 लाख 38 हजार 199 रुपयांचा भरघोस महसूल मिळाला आहे. पुणे आणि मुंबई या दोन प्रमुख शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या मावळ तालुक्यामध्ये आर्थिक वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांची मोठी उलाढाल झाली आहे. तालुक्यातील औद्योगिक वसाहती, तळेगाव दाभाडे, वडगाव, लोणावळा परिसरात असणारी शैक्षणिक संकुले, सह्याद्रीच्या डोंगरातील नयनरम्य निसर्ग सौंदर्य व येथील मुबलक पाणीसाठा व आरोग्यदायी वातावरण ही सर्वांनाच भुरळ घालतात. या ठिकाणी असणारी सुसंस्कृत सर्वांना सामोपचाराने घेणारी स्थानिक जनता यामुळे मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकरण होत आहे. याचाच फायदा येथे होणाऱ्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात होत आहे. तळेगाव दाभाडे येथे असणाऱ्या दुय्यम निबंधक वडगाव-2 या कार्यालयामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये शासनाला तब्बल 146 कोटी 29 लाख 38 हजार 199 रुपयांचा निधी मिळाला आहे. हा निधी 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत जमा झाला आहे. तळेगाव शहर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उंच उंच इमारती उभ्या राहत असून यामधील असणारे फ्लॅट खरेदी विक्रीसाठी तळेगाव दाभाडे येथील दुय्यम निबंधक वडगाव-2 हे कार्यालय उत्तम पर्याय आहे. या कार्यालयामध्ये नागरिकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध असून बैठक व्यवस्था देखील आहे. दुय्यम निबंध कार्यालयामध्ये असणारे सर्व कर्मचारी सहकार्याची भावना ठेवणारे असून याचे फलित म्हणून यावर्षी कार्यालयामध्ये 14 हजार 767 दस्त नोंदणी झाली आहे. कार्यालयात झालेल्या फ्लॅट, शेती, एन.ए. प्लॉट आदी दस्तांच्या नोंदणी पोटी सरकारच्या तिजोरीमध्ये 133 कोटी 96 लाख 96 हजार 551 रुपये स्टॅम्प ड्युटी व 2 कोटी 32 लाख 41 हजार 538 रुपये रजिस्ट्रेशन असा एकूण 146 कोटी 29 लाख 38 हजार 119 रुपये महसुल जमा झाला आहे. या आर्थिक वर्षातील सर्वांत कमी 1014 दस्त नोंदणी ऑक्टोबर महिन्यात झाली आहे. तर, सर्वांत जास्त 1511 दस्ताची नोंदणी डिसेंबर महिन्यात झाली आहे. वर्षाचे बाराही महिने येथील कार्यालयात नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. कार्यालयामध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच दस्त नोंदणी होते. यासाठी ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने टोकन दिले जाते. कार्यालयामध्ये नागरिकांना बसण्याची पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची उपलब्धता आहे. – कपिल मोरे, प्रभारी दुय्यम निबंधक