बातांग तोरु (इंडोनेशिया) : गेल्या आठवड्यात पश्चिम आशियातील मोठ्या भूभागामध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. एकाच वेळी इंडोनेशिया, श्रीलंका, थायलंड आणि मलेशिया या चारही देशांमध्ये या नैसर्गिक आपत्तीमध्ये तब्बल १,४०० जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्तीमुळे या देशांमधील आर्थिक असमतोलावर देखील प्रकाश टाकला आहे. या चार देशांपैकी इंडोनेशियामध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक ७५३ जण मरण पावले आहेत. त्या पाठोपाठ श्रीलंकेत ४६५ जण मरण पावल्याची माहिती आहे. आतापर्यंतचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. थायलंडमध्ये १८५ आणि मलेशियामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या देशांमधील दुर्गम भागात मदत पोचवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. भूस्खलनामुळे आणि पुरामुळे काही गावे गाडली गेली असून अजूनही किमान एक हजार जण बेपत्ता आहेत. इंडोनेशियात पुनर्वसनाची ग्वाही अध्यक्ष प्रबोवो सुबियांदो यांनी दिली आहे. पण तेथे यासाठी अजून श्रीलंकेसारखी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली गेलेली नाही. थायलंड आणि मलेशिया हे मध्यम उत्पन्न असलेले देश असून तुलनेत त्यांची आर्थिक क्षमता अधिक चांगली आहे. आपत्कालिन मदतीसाठी निधी संकलनाची क्षमता चांगली आहे. पण श्रीलंकेसाठी ही मोठी आपत्ती आहे. तर इंडोनेशियातल्या सुमात्रा येथे वादळाचा फटका २०१८ नंतर सर्वात भीषण होता.