कोपरगाव (प्रतिनिधी) -दोन महिन्यापासुन करोनामुक्त असलेल्या कोपरगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसात दुसरा करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे सुरक्षित कोपरगाव असुरक्षित दिसु लागला आहे.तालुक्यातील धोत्रे येथील एका 14 वर्षाच्या मुलीला करोनाबाधिता झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाटे यांनी दिली.
गेल्या आठवड्यात ठाणे येथुन दोन मुलींना त्यांचे आजोबा कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे घेऊन आले. संबंधित मुलींचे वडील करोना बाधित असल्याची माहिती उघड झाल्यानंतर आलेल्या दोन मुली व आजोबा या तिघांना शहरातील करोना केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केले होते. त्यांचे स्त्रॉव तपासणीसाठी पाठविण्यात आले असता त्यापैकी 14 वर्षाच्या मुलीचा वैद्यकीय अहवाल करोना बाधित आढून आल्याने कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.
बाधित मुलगी राहात असलेले धोत्रे गाव व परिसर सील करण्यात आला आहे. ठाणे येथून आल्याबरोबर बाधित मुलीसह तिघांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवल्याने यांच्या संपर्कात कोणी आले नाहीत, ही बाब समाधानकारक आहे. कोपरगाव तालुक्यातील नागरीकांना करोना संसर्गजन्य आजाराची लाग होणार नाही. विशेष खबरदारी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे, डॉ. वैशाली बडदे आढाव, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांच्यासह पोलीस, पालिका, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी आशासेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक व सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
शहरातील डॉक्टर महिलेच्या मामाला करोनाची बाधा होताच स्वतःहोवून एका खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेत आपल्या घश्याच्या स्त्रावच्या नमुन्यांची तपासणी करून घेत एक जागृत डॉक्टरची भूमिका पार पाडली तसेच तपासणी अहवाल येण्याच्या अगोदरच स्वतःपासुन आपल्या मुलांना व कुटुंबातील सदस्यांना लांब ठेवून संसर्ग होणार नाही. याची दक्षता बाधित महिला डॉक्टरने घेतल्याने त्यांच्या सहवासात आलेल्या सर्व व्यक्तींचा वैद्यकीय अहवाल करोना निगेटिव्ह आला आहे. एखाद्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचा साधा संशय आला तरी कशी काळजी घ्यावी, हेच या महिला डॉक्टरच्या कृतीतुन सिद्ध होते.
तालुक्यात आतापर्यंत करोना बाधितांची संख्या तीन झाली आहे.त्यापैकी एका 55 वर्षीय महिलेचा एप्रिल मध्ये उपचारा दरम्यान मृत्यु झाला. बाधित मुलगी व महिला डॉक्टरवर कोपरगाव येथे उपचार सुरू आहे तर सारी संसर्गजन्य आजाराने शिंगणापुर व संवत्सर मनाईवस्ती येथील महिलांचा काही दिवसापुर्वी मृत्यु झाला. हा अपवाद वगळता तालुका करोनामुक्त होता. परंतु लोणीवरुन आलेला मामा व ठाण्यातील वडिलांमुळे भाची मुलगी करोना बाधित निघाल्याने पुन्हा कोपरगाव तालुक्याला करोनाची बाधा झाली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरीकांची तपासणी व शोधमोहिम प्रशासनाच्या वतीने सुरु आहे.