बीजिंग – गाझा पट्ट्यातील पॅलेस्टिनींच्या १४ गटांनी आपापसातील वैर मिटवून तडजोड करण्याचा निर्णय घेतला आहे. या १४ गटांमध्ये फताह आणि हमासचाही समावेश आहे. या सर्व गटांनी आपापसातील अनेक वर्षे जुने वैर मिटवून ऐक्याच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. पॅलेस्टिनींमधील ऐक्याला समर्थ करण्यासाठी या सर्व गटांनी तडजोड मान्य केली आहे. आज झालेल्या बैठकीतील मध्यस्थीसाठी चीनने पुढाकार घेतला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या तीन दिवसांपासून या गटांशी चर्चसाठी समन्वय केला होता. इस्रायलने हल्ला केलेल्या गाझा पट्ट्यामध्ये सर्वसमावेशक, दीर्घकालीन आणि स्थायी युद्धविराम घडवून आणण्याची पहिली पायरी म्हणजे जाहीरनामा होता, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी या सर्व गटांच्या नेत्यांची भेट घेतली होती. स्वाक्षऱ्या करणाऱ्या गटांमध्ये हमासचा वरिष्ठ नेता मौलाना अबू मरझोक आणि फताहचा दूत मेहमूद अल-अलौलसह पॅलेस्टिनमधील अन्य १२ गटांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. चीनच्या मध्यस्थीने प्रथमच हे १४ गट एकत्र आले आहेत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे. या गटांमध्ये अतर्गत मतभेद दूर झाले असले, तरी आंतरराष्ट्रीय समर्थनाशिवाय हे शक्य नव्हते, असेही वँग यांनी म्हटले आहे. या चर्चेमध्ये इस्रायलचा कोणताही सहभाग नव्हता. गाझातील हंगामी सरकारसाठी ऐक्य… पॅलेस्टीनींच्या हितासाठी या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली जाणे महत्वाचे होते. हमास-इस्रायल युद्ध संपल्यानंतर गाझामध्ये राष्ट्रीय हंगामी सलोखा सरकार स्थापन करण्यासाठी ही तडजोड केली गेली आहे. पॅलेस्टिन लिबरेशन ऑर्गनायजेशन ही पॅलेस्टिनी लोकांसाठी आतापर्यंतची सर्वमान्य प्रतिनिधी संघटना आहे. आता हे १४ गट पॅलेस्टिनींचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. हमास गाझा पट्टीवर राज्य करत होते तर वेस्ट बँकच्या आंशिक प्रशासकीय नियंत्रण असलेल्या पॅलेस्टिनी ऍथोरिटीवर फताहचे नियंत्रण आहे. आज झालेल्या या तडजोडीमध्ये हमासची भूमिका काय असणार आहे, हे समजू शकलेले नाही.