जेऊर यात्रेतील दगडफेकप्रकरणी 14 आरोपींना अटक

नगर – नगर तालुक्यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी (रविवार दि. 7) झालेल्या दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. जेऊरच्या यात्रोत्सवात दोन गटात झालेल्या दगडफेकीत यात्रेतील दुकानदार महिला, लहान मुले व काही ग्रामस्थ असे सुमारे दहा ते बारा जण जखमी झाले होते.
दगडफेकीनंतर गावामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलीस नाईक दिपक गांगर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुमारे दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी गावामध्ये येऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली 14 आरोपींना अटक करण्यात आली.
इतर आरोपींच्या शोधासाठी विविध पोलीस पथके नियुक्त करण्यात आले असून पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू आहे. घटनेला पाच दिवस उलटून देखील गावात तणावपूर्ण शांतता आहे. गावात घोळक्याने जमणारे तसेच टारगट मुलांचा वावर पूर्णतः बंद झाल्याचे चित्र गावामध्ये दिसून येते. राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक तसेच एम.आय.डी.सी. पोलिसांचा बंदोबस्त आहे.
गावातील अनेक तरुण गायब
पोलिसांकडून आरोपी शोधण्याची मोहीम सुरू झाली असताना दोन्ही गटातील अनेक तरुण गावातून गायब झाले आहेत. मोबाईल बंद करून अटकेच्या भीतीपोटी तरुण गायब झाल्याचे चित्र गावामध्ये दिसून येत आहे.





