गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ
सीसीटीव्ही फुटेज असूनही कारवाई नाही
पुणे – लॉकडाऊन काळात प्रतिबंधित भागांतील गरजूंना महापालिकेकडून अन्नधान्य किट देण्यात येत आहेत. त्या वाटपाचा गोंधळ आणि मनमानी पद्धतीने किट वाटप होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यात सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाकडे आलेले 134 धान्य किटची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दि. 12 जून रोजी हा प्रकार घडला आहे. दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सहकरनगर पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दिल्यानंतरही अजून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याची या भागात जोरदार चर्चा सुरू आहे.
करोनाबाधितांची सर्वाधिक संख्या असलेले सुमारे 69 भाग 100 टक्के लॉकडाऊन करण्यात आले. त्यावेळी या भागातील गरजूंसाठी पालिकेकडून 72 हजार किट वाटपाचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार, तळजाई वसाहतीमध्ये दि. 20 व 24 मेदरम्यान या रेशन किटचे वाटप करण्यात आले होते. यातील उरलेले 134 किट्स हे विणकर सभागृहात ठेवण्यात आले होते. मात्र, सभागृहाच्या मागच्या बाजूचा दरवाजा उचकटून हे किट लंपास करण्यात आले आहेत. हा प्रकार समोर येताच सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त के. एच. लाखाणी यांनी सहकारनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना “याप्रकरणी गुन्हा दाखल करावा,’ असे पत्र दिले होते.
मात्र, अद्याप पोलिसांकडून त्याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. विशेष म्हणजे, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाल्याचे स्थानिक सांगत आहेत. मात्र, हे सर्व राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्याने कारवाई होत नसल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.