फलटण – फलटण तालुक्यातील दोन मृत करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने फलटण तालुका चांगलाच धास्तावला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. सध्या तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या 40 वर जाऊन पोहोचली असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फलटण तालुक्यात करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शुक्रवारी सकाळी संशयित पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असताना रात्री उशिरा आणखी 13 जणांची करोनाबाधितांमध्ये भर पडली आहे. त्यामध्ये होळ येथील करोनाबाधित मृत महिलेल्या संपर्कातील 7 तर तांबे येथील करोनाबाधिता मृत पुरुषाच्या संपर्कातील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, आणखी 33 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याने फलटण तालुक्याची चिंता कायम आहे.
मुळचे मुंबई येथील रहिवाशी असलेले आणि 15 मे रोजी तांबवे (ता फलटण) येथे आलेल्या 94 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा घरीच मृत्यू झाला होता. त्यांना कोणतीही लक्षणे नव्हती, मात्र त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर संबंधित मृत व्यक्तीचा अहवाल हा करोना पॉझिटिव्ह आला होता. आता या व्यक्तीच्या संपर्कातील 6 जणांचे रिपोर्टसुद्ध पॉझिटिव्ह आले आहेत.
याआधी तांबवे येथील कोरियात गेलेली विद्यार्थीनी आणि एक छोटी मुलगी करोना पॉझिटिव्ह झाली होती. 94 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या संपर्कातील 6 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याचे कळताच खळबळ उडाली आहे. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे संपूर्ण तांबवे गाव भीतीच्या छायेखाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या ग्रामपंचायतीच्यावतीने गावांत जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. पोलीस बंदोबस्त चोख ठेऊन गावातील कुणालाही बाहेर न येण्याची सक्त ताकीद प्रशासनाने देऊन ताबडतोब उपाययोजना सुरु केल्या आहेत. आसपासच्या गावांमध्येसुद्धा उपाययोजना सुरु करण्यात आलेल्या आहेत.
ठाणे येथून होळ (ता. फलटण) येथे आलेल्या आणि परवा मयत झालेल्या 89 वर्षीय महिलेचा मरणोत्तर स्वब घेण्यात आलेला होता. तो 28 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. सदरच्या महिलेला फलटण येथील दफनभूमीत दफण करण्यात आले होते. काल उशीरा होळ येथील मयत पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील 7 व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे होळ येथेही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आणखी 33 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आजअखेर फलटण तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह झालेल्यांची संख्या 40 वर पोहचली आहे.