– शेतकऱ्यांच्या खात्यात 9 हजार 35 कोटी रुपये जमा मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिध्द केल्यानंतर अवघ्या 5 दिवसांत 15 लाख 45 हजार शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. यापैकी 13 लाख 88 हजार शेतकरी कर्जमुक्त झाले असून त्यांच्या खात्यात कर्जमाफीची सुमारे रुपये 9 हजार 35 कोटी रूपये जमा झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना याबाबतीत कुठलीही अडचण येऊ नये व त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना सहकार विभागास दिल्या आहेत. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अतिशय पारदर्शक पध्दतीने शेतकऱ्यांची गावनिहाय यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या नावाचा समावेश यादीमध्ये असल्याबाबतची खात्री पटली. सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने यादी प्रसिध्दीकरण आणि आधार प्रमाणिकरण विनाखंड व विनातक्रार पार पाडण्यासाठी पूर्व नियोजन केले आहे. ही कार्यवाही राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मोहिम स्वरूपात राबविण्यात येत आहे, अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली. प्रमाणिकरणामध्ये ज्या शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक किंवा कर्जखात्यामध्ये दर्शविलेली रक्कम अमान्य आहे अशा सर्व प्रकरणांध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा स्तरीय समिती मार्फत तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. प्रमाणिकरण केल्यानंतर शेतकऱ्यास योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम व्यापारी बॅंकांच्या बाबतीत अवघ्या 24 तासात व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्याबाबत 48 तासात थेट त्यांच्या कर्जखात्यावर जमा होत आहे. यासाठी आवश्यक निधी शासनाने तातडीने उपलब्ध करुन दिला आहे.