इंडोनेशियातील ज्वालामुखीत 13 जणांचा मृत्यू

लुमाजांग (इंडोनेशिया)- इंडोनेशियातील माऊंट सुमेरू या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 13 जण बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र तप्त लाव्हा आणि पावसामुळे जालेल्या चिखलाच्या मोठ्या थरामुळे या व्यक्तींच्या शोधाच्या कामात अडथळे येत आहेत.
ईस्ट जावा प्रांतातील लुमाजांग जिल्ह्यातील माउंट सुमेरू या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यापासून या परिसरात धूराचे प्रचंड ढग पसरले आहेत. राख आणि जळत्या दगडांचे ढिग सर्वत्र पसरले आहेत. या ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या ढगांचे मोठे लोट हवेत दूरवरूनही दिसू लागले आहेत.
ज्वालामुखीची राख तब्बल 12 हजार मीटर उंचीपर्यंत पोचली आहे. डोंगरमाथ्यावरून तप्त लाव्हा आणि पाण्याचे लोंढे वहात पायथ्यांच्या गावांपर्यंत पोचले आहेत. या ज्वालामुखीमुळे निर्माण झालेल्या ढगांनी या परिसरात मोठा पाऊस देखील सुरू झाला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना तातडीने आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायला लागला आहे. शनिवारी दोनवेळा लाव्हा आणि पाण्याचे लोंढे जवळच्या नदीमध्ये मिसळले होते, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
लाव्हा आणि चिखलाच्या राड्यारोड्यामुळे दोन गावांना जोडणारा एक पूल उद्ध्वस्त झाला आहे. इतर काही चोटे पूल देखील चिखलाखाली गाडले गेले आहेत.
माउंट सुमेरू हा ज्वालामुखी गेल्यावर्षापासून धगधगतो आहे. तेंव्हापासून तीनवेळा त्याचा उद्रेक झाला आहे. आताची त्याची तीव्रता चतुर्थ श्रेणीची म्हणजे सर्वाधिक असल्याचे इंडोनेशियाच्या व्होल्कॅनोलॉजी सेंटर ऍन्ड जिऑलॉजिकल हजार्ड मिटिगेशन डिपार्टमेंटने म्हटले आहे.





