वॉशिंग्टन – करोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी एक बातमी आहे. जगातील 13 देश करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, असे असले तरी चिंतेची बाब म्हणजे 131 देशांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात समूह संसर्ग होत असल्याचेही पुढे आले आहे.
असमान लस धोरणांमुळे जगाला आपत्तीजनक नैतिक अपयशाला तोंड द्यावे लागले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे. बीबीसी वाहिनीच्या वृत्तानुसार, डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस घेब्रेयसिस म्हणाले की, 49 श्रीमंत देशांत 39 दशलक्षपेक्षा जास्त लस डोस देण्यात आल्या आहेत. परंतु एका गरीब देशाला फक्त 25 डोस आहेत. दरम्यान, डब्ल्यूएचओ आणि चीन या दोघांवर त्यांच्या कोविड प्रतिसादाबद्दल यापूर्वीच टीका झाली.
जगातील 13 देशांना जागतिक आरोग्य संघटनेने करोनामुक्त म्हणून जाहीर केले आहे. मात्र या देशांमध्ये खबरदारी घेणे आवश्यक आहे, असेही सांगण्यात आले आहे. चिंतेची बाब म्हणजे 131 देशांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन होत आहे असे आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. या 131 देशांच्या यादीत पाकिस्तान, अमेरिका, ब्राझिल, ब्रिटन, फ्रान्स यांचा समावेश आहे.
जगात जानेवारीच्या पहिल्या 20 दिवसांत सर्वात जास्त करोनाचे रुग्ण आढळलेत, तसेच सर्वात जास्त मृत्यूही झालेत. 8 जानेवारीला जगात तब्बल 8 लाखांहून अधिक रुग्ण आढळले. यापूर्वी इतके रुग्ण कधीच सापडलेले नव्हते. त्याचप्रमाणे 13 जानेवारी रोजी सर्वाधिक 16 हजार 537 लोकांनी आपला जीव गमावला.