पाटणा – बिहारमधील छपरा-बलिया दरम्यान गौतमस्थान स्थानकासमीप ताप्ती-गंगा सूरत-छपरा एक्स्प्रेसचे 13 डबे रुळावरून घसरल्याने दुघर्टना घडली. यात 4 प्रवाशी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत रेल्वे प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले आहे.
या दुर्घटनेबाबत हाती आलेल्या वृत्तानुसार, आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमाराला छपराहून ताप्ती गंगा एक्स्प्रेस निघाली होती. 45 मिनिटांचा प्रवास करत ही एक्स्प्रेस गौतमस्थान स्टेशनवर पोहोचत असतानाच पावणे दहाच्या सुमारास एक्स्प्रेसचे 13 डबे रुळावरून घसरले. स्टेशनजवळ येत असल्याने एक्स्प्रेसचा वेग कमी होता. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती उत्तर-पूर्व रेल्वेचे जनसंपर्क अधिकरी संजय यादव यांनी दिली. हा अपघात छपरापासून 10 किमी अंतरावर घडला.
दरम्यान, छपरा-बलिया मार्गावर रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, बचाव कार्य सुरू आहे. या दुर्घटनेबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिका-यांनी सांगितले.