पुणे -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या बारावीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने सोशल मीडियावरून व्हायरल झाली. हा प्रकार बुलढाण्यातील एका परीक्षा केंद्रावर घडला आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेतली जाणार नसल्याचे राज्य शिक्षण मंडळाकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. तसेच विविध उपाययोजनाही करण्यात येत असूनही गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड येथे झालेल्या गैरप्रकारात काही शिक्षकांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता शुक्रवारी गणिताच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने समाज माध्यमात फिरल्याचे दिसून आले. सिंदखेडराजा येथे हा प्रकार झाल्याची माहिती आहे. सकाळी 11 वाजता गणित विषयाचा पेपर सुरू होणार होता. त्यापूर्वीच प्रश्नपत्रिकेची दोन पाने सोशल मीडियातून व्हायरल होत असल्याचे दिसून आले. ही बाब सर्वत्र पसरली. त्यामुळे गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा सुरू होती; परंतु केवळ एका केंद्रावरून हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर राज्यात सर्वच ठिकाणी पेपर फुटला असे म्हणणे चुकीचे आहे, असे बोर्डाचे म्हणणे आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, बुलढाण्यातील एका परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. मात्र पेपर अकरा वाजता सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेची दोन पाने समाजमाध्यमातून व्हायरल झाल्याचे वृत्त हाती येताच, संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रश्नपत्रिकेची दोन पाने समाजमाध्यमावर कशी आली, किती विद्यार्थ्यांपर्यंत ही पाने पोहोचली, याची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल. बारावीचा गणिताचा पेपर बुलढाण्यात फुटल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. यावरून हे सरकार झोपले आहे का असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित करत विधानसभेत संताप व्यक्त केला. अजित पवार म्हणाले, गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच फुटला. अभ्यास करणाऱ्या मुलांचे यामुळे किती वाटोळे होते. सरकार झोपले की काय, काय चालले कळत नाही. मी बोललो की बोलता दादा बोलतात, अशा संतापलेल्या सुरात त्यांनी सरकारला धारेवर धरले. अजित पवारांनी पेपरफुटीचा मुद्दा मांडताच माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही सभागृहात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. या सरकारच्या काळात परीक्षा सुरू झाल्यापासूनच सातत्याने समस्या सुरू आहेत. बारावीच्या इंग्रजीच्या पहिल्याच पेपरात दोन-दोन गुणांचे तीन प्रश्न चुकीचे आले. त्यानंतर मराठीच्या पेपरएवजी इंग्रजीचा पेपर मुलांना मिळाला. आता तिसरी घटना म्हणजे बुलढाण्यात पेपर अर्धातास आधीच फुटला आहे. हे सरकार नक्की काय करत आहे? कॉपीमुक्त परीक्षेसाठी यांनी भरारी पथक नेमले, मोबाइल निषिद्ध केले, दहा मिनिटे आधी पेपर द्यायचा हे ठरवले गेले. मग तरीही अर्धा तास आधी पेपर बाहेर गेला कसा, असे प्रश्न वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, पेपर फुटीचा मुद्दा गंभीर आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे सरकारने याविषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची आवश्यकता आहे. याप्रकरणी केंद्र प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करता येईला का यासंदर्भात आज सायंकाळपर्यंत राज्य सरकार निवेदन सादर करेल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.