पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवार (दि.21) पासून सुरूवात झाली. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या काही सवलती यंदाच्या परीक्षेत रद्द करण्यात आल्या. कॉपीमुक्तीच्या पार्श्वभूमीवरील नियमावलीनुसार आता परीक्षा “शिस्तीत’ सुरू झाली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळातून एकूण 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात 7 लाख 92 हजार 780 मुले, तर 6 लाख 64 हजार 441 मुलींचा समावेश आहे. 3 हजार 195 परीक्षा केंद्रांवर परीक्षेला सुरुवात झाली आहे. करोनाच्या प्रादुर्भावाच्या कालावधीत झालेल्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना काही सवलती देण्यात आल्या होत्या. यंदाच्या परीक्षेत या सर्व सवलती रद्द करण्यात आल्या. नियमीतपणे होणाऱ्या परीक्षेप्रमाणेच नियमावलीनुसार आता परीक्षा सुरू झाली आहे. पहिला इंग्रजी विषयाचा पेपर सोपा असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 17 कॉपीबहाद्दर सापडले इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये कॉपी करताना 17 विद्यार्थी सापडले आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविले जात असताना काही ना काही प्रमाणात कॉपीची प्रकरणे आढळून येऊ लागली आहेत. पुणे विभागात सर्वाधिक 7 कॉपीची प्रकरणे आढळून आली आहे. नागपूर-3, औरंगाबाद-3, अमरावती-1, नाशिक-2, लातूरमध्ये 1 याप्रमाणे कॉपीसारख्या गैरमार्गाची प्रकरणे आढळून आली आहेत. दरम्यान, मुंबई, कोल्हापूर, कोकण या विभागात एकही कॉपीचे प्रकरण आढळून आलेले नाही. औक्षण अन् पुष्पवृष्टी भावे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टीही करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण झाला होता. सर परशुरामभाऊ महाविद्यालयातही विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. बहुसंख्य महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, पेढे, साखर वाटप करुन स्वागत करण्याला प्राधान्य देण्यात आले. परीक्षेसाठी शुभेच्छा देण्याबाबतचे फलकही आकर्षपणे सजविण्यात आले होते. परीक्षा केंद्रांवरील चित्र विद्यार्थ्यांची सकाळी 10 वाजल्यापासून परीक्षा केद्रांवर गर्दी होण्यास सुरुवात पालकही विद्यार्थ्यांसोबत मोठ्या संख्येने उपस्थित शिक्षकांकडून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचना परीक्षेबाबतचे विद्यार्थ्यांचे दडपण दूर करण्याच्या दृष्टीकोनातून जागृती विद्यार्थ्यांना बैठक क्रमांकाच्या ब्लॉकची शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून माहिती परीक्षा सुरु होताच आवारातून पालकांना बाहेर जाण्याबाबतच्या सूचना