रक्षाबंधननिमित्त पीएमपीच्या 120 जादा बस

पिंपरी – दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्षाबंधननिमित्त पुणे परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. दैनंदिन पुणे व पिंपरी-चिंचवड येथे धावणाऱ्या 1 हजार 673 बसेस बरोबर पुणे व पिंपरी-चिंचवडसाठी 120 जादा बसेसचे नियोजन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यंदा रक्षाबंधन 15 ऑगस्ट रोजी असल्याने स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी सर्वांना असणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी संख्या असण्याचा अंदाज पीएमपीकडून वर्तवण्यात आला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी तसेच एक दिवसआधी व नंतर असे तीन दिवस 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान जादा बसेसची सेवा दिली जाणार आहे.

याकरिता पीएमपीच्या चालक, वाहक, पर्यवेक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, महत्वाच्या मार्गावर बस संचलन नियंत्रणासाठी अतिरिक्‍त अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. रक्षाबंधनाच्या वेळी आपल्या बहिण-भावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पीएमपी प्रशासन विशेष प्रयत्न करत असताना दिसत आहे. त्यासाठी आतापासून तयारी सुरू केली असून नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.