Death of Tigers : महाराष्ट्रात नववर्षात 12 वाघांचा मृत्यू

मुंबई : राज्यात एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत विविध घटनांमध्ये एकूण 12 वाघांचा मृत्यू झाला. 30 डिसेंबर 2023 ते 22 जानेवारी 2024 या 22 दिवसांमध्ये विविध कारणांमुळे वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. तसेच राज्यात होणारे वाघांचे मृत्य आणि शिकार रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. दुसरीकडे इलेक्ट्रिक वायरमध्ये अडकून मोठ्याप्रमाणात वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्या संदर्भात ही कठोर पावले उचलेल जाण्याची शक्यता आहे.
अवैध शिकाऱ्यांची माहिती मिळण्यासाठी खबऱ्यांची नेमणूक करा, अशा सूचना वन मंत्र्यांनी दिल्या आहेत. व्याघ्र संरक्षण दलातील पथकामार्फत अतिसंवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त करा. शिवाय डॉग स्कॉड अंतर्गत सुद्धा गस्त घालून शिकारींच्या हालचालीवर नियंत्रण ठेवा, अशा सूचना गणेश नाईक यांनी दिल्या. अतिसंवेदनशील क्षेत्रात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करा.
सायबर सेलच्या माध्यमातून शिकारीच्या घटनांमधील आरोपींचा शोध घ्या. तसेच अतिसंवेदनशील क्षेत्रात नाक्यांवर तपासणी करून चौकशी करा. वाघाचे भ्रमणमार्ग, पाणवठे व महत्वाचे ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवा, इत्यादी निर्देशही नाईक यांनी दिले आहेत. वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी राज्य वन विभाग आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहेत. शिवाय वन्यजीव संरक्षणासाठी रणनीती आखण्यासाठी जिल्हास्तरीय व्याघ्र समितीच्या बैठका घेतल्या जात असल्याचे नाईक यांनी सांगितले.
महाराष्ट्रात 2022 मध्ये 444 वाघ
वाघांची जनगणना दर चार वर्षांनी होत असते. मागील काही केलेल्या जनगणनेमधून महाराष्ट्रामध्ये वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 2006 मध्ये राज्यात 103 वाघ होते. 2010 मध्ये हा आकडा 169 वर गेला. 2018 मध्ये 312 तर 2022 मध्ये वाघांची संख्या 444 पर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.





