नवी दिल्ली : महिलांवर कौटुंबिक हिंसाचारापासून अत्याचारापर्यंतच्या १२,६०० हजार तक्रारी राष्ट्रीय महिला आयोगाकडे अर्थात एनसीडब्ल्यूकडे आतापर्यंत दाखल झाल्या आहेत. यातील सगळ्यांत जास्त तक्रारींची नोंद उत्तर प्रदेशात करण्यात आली आहे. दाखल तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी कौटुंबिक हिंसाचाराच्या आणि छळवणुकीच्या आहेत. उत्तर प्रदेशनंतर दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा दुसरा आणि तिसरा क्रमांक आहे. विशेष म्हणजे हिंसाचाराची गेल्या वर्षभरापासून झळ सोसत असलेल्या मणिपूर या राज्यात केवळ तीन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एकूण १२,६०० तक्रारींपैकी ६४७० तक्रारी उत्तर प्रदेशातील आहेत. दिल्ली १११३, तर महाराष्ट्रात ७६२ तक्रारी दाखल आहेत. अन्य राज्यांत तामिळनाडू ३०१, कर्नाटक ३०५, बिहार ५८४, मध्य प्रदेश ५१४, हरियाणा ५०९, राजस्थान ४०८, प. बंगाल ३०६ अशी आकडेवारी आहे. महिलांवरच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या सगळ्यांत जास्त ३५४४ तक्रारी दाखल आहेत. हुंड्यासाठी छळ १९५७ तर छेडछाडीच्या ८१७ तक्रारी दाखल आहेत. महिलांप्रती पोलिसांच्या उदासिनतेच्या ५१८, बलात्कार- बलात्काराचा प्रयत्नच्या ६५७ तक्रारींचाही त्यात समावेश आहे. आकडेवारीनुसार लैंगित छळवणुकीच्या ४९३, सायबर गुन्ह्यांच्या ३३९, पाठलाग करण्याच्या ३४५ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.