पुणे जिल्हा | गोमाताच्या सभासदांना 12 टक्के लाभांश

आळेफाटा, (वार्ताहर) – वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील गोमाता सहकारी दूध उत्पादक संस्थेस 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षात संस्थेत दूध घातलेल्या 10 लाख 17 हजार 111 लिटर दुधावरती प्रतिलिटर दोन रुपये प्रमाणे गवळी बोनस तरतूद केली आहे. 31 मार्च 2024 चा निव्वळ नफा 13 लाख 24 हजार 129 रुपये झाला असून सभासदांना 12 टक्क्यांप्रमाणे लाभांश देण्यात येणार आहे.
गोमाता सहकारी दूध उत्पादक संस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संत सावता महाराज मंदिरात संस्थेचे अध्यक्ष गणेश मारुती वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, त्यावेळी वरील निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे सचिव अभिषेक कोकाटे यानी दिली.
याप्रसंगी उपाध्यक्ष गणेश देवकर, संचालक विलास गडगे, संदीप गडगे, गोपाळ फुलसुंदर, सविता शिंदे, रेश्मा चौगुले, तज्ज्ञ संचालक संदीप गडगे, माजी अध्यक्ष अशोक गडगे, सभासद सुरेश चौगुले, गजानन गडगे, प्रकाश गडगे, डॉ. सोबलेवरळ यांसह सर्व सभासद व दूध उत्पादक आदी मान्यवर उपस्थित होते.
संचालक सुरेश गडगे म्हणाले की, 2023-24 या आर्थिक वर्षात लेखापरीक्षण अहवालात संस्थेस सालाबादप्रमाणे अ श्रेणी मिळाली असल्याचे नमूद केले. दरम्यान, सभासदांच्या प्रश्नांना संचालक मंडळाने समाधानकारक उत्तरे दिली व सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी संस्थेस सर्वाधिक दूधपुरवठा करणार्या दूध उत्पादकांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून इयत्ता दहावीतील 12 विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश देवकर यांन तर दीपक गडगे यांनी आभार मानले.
संस्थेचा आर्थिक प्रगतीचा आलेख हा उंचावलेला असून संस्थेचा कारभार पारदर्शक असल्याने हा आलेख आणखी उंचावत जाणार आहे. – बाळासाहेब खिलारी, माजी अध्यक्ष तथा संचालक, दूध संघ, पुणे जिल्हा





