पुणे – तब्बल 24 वर्षांनी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या निवडणुकीत रंग भरण्यास सुरूवात झाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीस आणि स्वीकृतीस सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 10 जणांनी 12 अर्ज भरले आहेत. चारपैकी तीन मतदार संघातून हे अर्ज आले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून अजून एकही अर्ज दाखल झालेला नाही. सर्वाधिक सेवा सहकारी संस्था गटातून 7 अर्ज आले आहेत. त्याबरोबर हमाल मापाडी मतदार संघातून दोघांनी तीन अर्ज आणि व्यापारी आडते मतदार संघातून एका उमेदवारानेच दोन अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी याबाबत माहिती दिली. पूर्वी ही निवडणूक 29 एप्रिलला होऊन 30 एप्रिल रोजी मतमोजणी होणार होती. मात्र, सुधारित कार्यक्रमानुसार 28 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण 18 जागांसाठी 17 हजार 746 जण मतदान करणार आहेत. व्यापारी आडते मतदार संघात सर्वाधिक 13 हजार 974 मतदार आहेत. ते दोन प्रतिनिधी निवडून देणार आहेत. सेवा सहकारी संस्था मतदार संघातून सर्वाधिक 11 उमेदवार निवडणूक येणार आहेत. यासाठी हवेली तालुक्यातील विविध सेवा कार्यकारी सोसायटीचे 1 हजार 852 जण मतदान करणार आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून चौघे विजयी होणार आहेत. यासाठी हवेली तालुक्यातील 713 ग्रामपंचायत सदस्य मतदान करणार आहेत. हमाल मापाडी गटातून एक प्रतिनिधी निवडला जाईल. असा आहे निवडणूक कार्यक्रम उमेदवारी अर्ज दाखल करणे : दि. 3 एप्रिलपर्यंत उमेदवार अर्ज छाननी : दि. 5 एप्रिल उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी : दि. 6 ते 20 एप्रिल उमेदवारांची अंतिम यादी, चिन्हवाटप : दि.21 एप्रिल मतदान : दि. 28 एप्रिल मतमोजणी आणि निकाल : दि. 29 एप्रिल