‘तो’ सर्प मांडूळ जातीचाच असल्याचा सबळ पुरावा नाही; अखेर तिघांची निर्दोष मुक्तता

पुणे – गुन्ह्यात जप्त 12 लाख रुपयांचा सर्प (snake) हा मांडूळ जातीचाच आहे, हा दाखविणारा पुरावा नसल्याने मांडूळ बाळगल्याप्रकरणात अटक केलेल्या तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. खडकी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श.गि.दुबाले यांनी हा आदेश दिला. (pune court)
योगेश शिवाजी अवसरे, समाधान संजय गोडगे आणि पांडुरंग धुळदेव डाकवाले (तिघेही, रा. परांडा, जि. उस्मानाबाद) यांची मुक्तता करण्यात आली. बचाव पक्षातर्फे ऍड. ललित वाघमारे आणि ऍड. ए.ए.पिरजादे यांनी काम पाहिले. वाघोली येथील वनसंरक्षक यांना 23 मार्च 2018 रोजी मांडूळ विक्रीसाठी व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली. याची माहिती त्यांनी विश्रांतवाडी पोलिसांना दिली.
पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत तिघांना अटक केली. त्यांच्याकडून 12 लाख रुपये किंमतीचे 1 किलो 232 ग्रॅम वजन आणि लांबी 48 इंच असलेले मांडूळ जप्त करण्यात आले. मात्र, या प्रकरणात अपुरे पुरावे असल्याचे ऍड. वाघमारे आणि पिरजादे यांनी दाखवून दिले.
घटनेतील गाडीचा मालक कोण, जप्त सर्पाचे छायाचित्र नाही. तो सर्प संरक्षित वन्यजीवमध्ये पडतो का, यावर प्रधान मुख्य संरक्षण वनअधिकारी अथवा नॅशनल झुलॉजी सर्वे ऑफ इंडियाचा अभिप्राय घेतला नाही. सापळ्याशिवाय इतर साक्षीदार नसल्याचे दाखवून देण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने हा आदेश दिला.





