टोरांटो – पूर्व टोरंटोमधील एका पबमध्ये झालेल्या गोळीबारात १२ जण जखमी झाले आहेत. एकूण तीन जणांनी बारमध्ये घुसून कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे गोळीबार केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. शुक्रवारी रात्री १०:४० च्या सुमारास पायपर आर्म्समध्ये गोळीबार झाल्याचे अनेक आपत्कालीन कॉल पोलिसांना आले. असे टोरंटो पोलिस सेवेचे अधीक्षक पॉल मॅकइंटायर म्हणाले. तीन बदुकधारी पबमध्ये घुसले आणि त्यांनी ग्राहकांवर आणि अन्य नागरिकांवर गोळीबार करायला सुरुवात केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. एका हल्लेखोराकडे असॉल्ट रायफल असल्याचे दिसून येत होते, तर इतर दोघांकडे पिस्तूल होती. ते बारमध्ये घुसले, आणि त्यांनी आत बसलेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला, असे मॅकइंटायर म्हणाले, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एकूण १२ जण जखमी झाल्याचे पोलिसांना आढळले. सर्व जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही. यातील ६ जणांना बंदुकीच्या गोळ्या लागल्या आहेत. तर उर्वरित ६ जणांना फुटलेल्या काचांमुळे जखमा झाल्या आहेत, असेही पोलिसांनी सांगितले. गोळीबार केल्यानंतर हे हल्लेखोर कारमधून पळून जाताना दिसले. पोलिसांनी नागरिकांना घरातच थांबण्याची सूचना केली आहे.