ढाका : बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी उच्च न्यायालयाच्या 12 न्यायाधीशांना न्यायालयीन कामकाजातून निलंबित केले. आवामी लीग पक्षाशी संंबंधित फॅसिस्ट न्यायाधीशांना न्यायप्रणालीतून वगळण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभुमीवर सर्वोच्च न्यायालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. भेदभावविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या शेकडो आंदोलकांनी बुधवारी उच्च न्यायालयाच्या परिसराला घेराव घातला होता. त्यानंतर सरन्यायाधीश सय्यद रेफात अहमद यांनी हा निर्णय घेतला. या 12 न्यायाधीशांना आता प्रकरणांची सुनावणी सोपवण्यात येणार नाही. म्हणजे 20 ऑक्टोबरपासून न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर त्यांना न्यायालयीन कामकाजात भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही,असे सर्वोच्च न्यायालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे. न्यायाप्रणालीतील जे न्यायाधीश आवामी लीगपक्षाशी संबंधित आहेत, त्यांना हटवण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयातच पहिल्यांदा केली होती. आता 12 न्यायाधीशांना वगळण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले नियोजित आंदोलन शनिवारपर्यंत पुढे ढकलले आहे.