अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तास्थापनेदरम्यान भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये झालेल्या युतीमुळे काँग्रेस पक्षात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांवर कारवाईचा इशारा देण्यात आल्यानंतर, संबंधित १२ नगरसेवकांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या घटनेमुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षाने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. अंबरनाथ नगरपालिकेत शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप–काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी आघाडी आकाराला आली होती. मात्र, राज्य व देशपातळीवर परस्परविरोधी विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि भाजपमधील युतीमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. युतीवर टीका वाढताच काँग्रेस नेतृत्वाने आक्रमक भूमिका स्वीकारत संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या १२ नगरसेवकांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षातील अस्वस्थता अधिकच वाढली आहे. या प्रकाराला काँग्रेसने बेकायदेशीर आणि असंवैधानिक ठरवत, संबंधित नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार या नगरसेवकांविरोधात तातडीने कारवाई सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले की, “काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करणे किंवा थेट दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे हे अनैतिक तर आहेच, पण घटनाविरोधीही आहे. या सर्व १२ नगरसेवकांना लवकरच कायदेशीर नोटीसा बजावण्यात येतील.” काँग्रेसच्या या कठोर भूमिकेमुळे अंबरनाथमधील राजकीय वातावरण तापले असून संबंधित नगरसेवकांमध्ये मोठी धडधड निर्माण झाली आहे. आत पुढे काय कारवाई होते, नगरसेवकांचे पद रद्द होईल का हे पाहणे महत्वाचे आहे.