करोनाचा उच्चांक : 13 जणांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 18 हजारांचा टप्पा पार केला आहे. आज शहरात करोनाने पुन्हा एक नवीन उच्चांक केला. एकाच दिवशी तब्बल 1181 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 13 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शहरात मंगळवारी 1133 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील 48 जणांचे तपासणी अहवाल सकारात्मक आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 18,397 इतकी झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सद्यःस्थितीत शहरात 3854 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 304 रुग्णांचाही समावेश आहे. शहरात आजपर्यंत 382 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 303 व शहराबाहेरील 79 रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी दिवसभरात 13 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 11 तर शहराबाहेरील 2 रुग्णांचा बळी गेला.
आकडेवारीची लपवाछपवी
महापालिकेने सोमवारी प्रेसनोटमध्ये 292 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. परंतु त्याचवेळी पालिकेच्या डॅशबोर्डवर मात्र शहरातील 304 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दर्शविण्यात येत होते. मंगळवारीही पालिकेचा डॅशबोर्ड 312 मृत्यू झाल्याचे दर्शवित होता, परंतु पालिकेची प्रेसनोटवर मात्र 302 रुग्णांच्या मृत्यूची नोंद दाखविण्यात आली. केवळ महापालिकाच नाही तर राज्य शासनाच्या संकेतस्थळावरही रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविले जात आहेत.
मंगळवारी शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 18,397 इतकी झाली आहे. मात्र राज्य सरकारने 17,678 रुग्णसंख्या दाखवत 719 रुग्ण लपविले आहेत. तर शहरात स्थानिक व बाहेरील असे मिळून 382 मृत्यू झाले आहेत. मात्र सरकारने 316 मृत्यू दाखवत तब्बल 66 मृत्यू लपविले आहेत.