बारामती : बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात ११५ ठिकाणी मतदान केंद्र मतदारांसाठी सज्ज होत आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चालू असलेल्या निवडणुका कार्यक्रमाचा अंतिम टप्पा आता आलेला आहे. सद्यस्थितीत बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने शहरांमध्ये ११५ ठिकाणी मतदान केंद्र तयार करण्यात आलेली असून सर्व मतदान केंद्रावर बारामती नगरपरिषदेमार्फत सर्व व्यवस्था पुरविण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी व्हील चेअरची सुविधा करण्यात आलेली आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आदर्श महिला मतदान केंद्र अंतर्गत तांदूळवाडी हद्दीतील मतदान केंद्र क्र ३/१ मेडिकोज गिल्ड हॉल, तांबेनगर व मतदान केंद्र क्र १५/५ – स्टेशन रोड, रामगल्ली येथील मतदान केंद्रांवर महिला अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी दिली. या ११५ मतदान केंद्रांवर एकूण १,०१,९९२ मतदार दि. २० रोजी मतदानाच्या दिवशी मतदान करणार आहेत. बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण २० प्रभागांकरिता एकूण १४५ उमेदवार व अध्यक्षपदासाठी १४ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी सुमारे ७५० अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांना मतदान अधिकारी व कर्मचारी यांना दि. १६ नोव्हेंबर रोजी रोजी पहिले, दि. २४ नोव्हेंबर रोजी दुसरे, दि. २७ नोव्हेंबर रोजी तीसरे व दि. १६ डिसेंबर रोजी चवथे, अशी एकूण चार मतदान प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच एकूण ११५ मतदान केंद्रांवर मतदान साहित्य वाटप व स्वीकारण्यासाठी म.ए.सोचे ग. भि. देशपांडे विद्यालय सभागृह, बारामती येथे केंद्र उभारण्यात आलेले असून या ठिकाणी पोलीस, पोलीस स्टेशनमार्फत बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. बारामती नगरपरिषदेमार्फत सर्व मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी दि. १४ रोजी राजकीय प्रतिनिधीच्या उपस्थितीत मतदानाकरिता लागणारी मतदान यंत्रे (EVM मशिन) तयार करून स्ट्रॉगरुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. देशपांडे विद्यालयात मतमोजणी बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदान मोजणी २१ डिसेंबर रोजी म.ए.सो चे ग.भि देशपांडे विद्यालयाच्या सभागृहात सकाळी १०. ०० वाजल्यापासून होणार आहे. ही मतदान मोजणीसाठी एकूण १५७ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदान मोजणी केंद्रावर अधिकृत ओळखपत्र असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येणार आहे. त्या व्यतीरिक्त अन्य कोणासही प्रवेश देण्यात येणार नाही.