पालघर : एका ११ वर्षांच्या शाळकरी मुलाने त्याच्या मित्राच्या मदतीने एका बिबट्याशी धैर्य दाखवत झुंज दिली आहे. शुक्रवारी संध्याकाळी माला पडवीपाडा परिसरात शाळेतून परतत असताना एका बिबट्याने पाचवीच्या वर्गातील मयंक कुवरावर हल्ला केला. त्याने आणि दुसऱ्या मुलाने धाडसाने ओरडून त्या बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. बिबट्याने मयंक कुवरावर जेव्हा झडप घातली तेव्हा, त्याची स्कूल बॅग संरक्षण कवच ठरली. स्कूल बॅग नसती तर या चकमकीचे आणखी वाईट परिणाम झाले असते. गोंधळ आणि मुलांच्या जलद प्रतिक्रियेमुळे लोक घटनास्थळी धावले आणि बिबट्या पुन्हा जंगलात पळून गेला. कुवराच्या हाताला दुखापत झाली आहे आणि सध्या तो विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे. कंचडचे निवासी वन अधिकारी स्वप्नील मोहिते यांनी सांगितले की, वन अधिकारी तातडीने घटनास्थळी आणि नंतर मुलाला ज्या रुग्णालयात नेण्यात आले होते त्या रुग्णालयात दाखल झाले. वन विभाग या घटनेला गांभीर्याने घेत आहेत आणि अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहेत. वन विभागाने बिबट्या प्रवण क्षेत्रातील शाळा दुपारी ४ वाजेपर्यंत बंद करण्याची विनंती केली आहे. बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एआय-सक्षम कॅमेरा बसवण्यात येत आहेत. तसेच, पारंपारिक दवंडी (सार्वजनिक घोषणा) द्वारे गावांना सतर्क केले जात असल्याचे मोहीते म्हणाले.