हवेली: कोविड-१९ चा प्रादुर्भाव आढळून आलेने हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी तालुक्यातील ११ गावातील ज्या ठिकाणी रूग्ण आढळून आले आहेत ते परिसर मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहेत. यामुळे कोविड-१९ चा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी व संभाव्य सामुदायिक प्रसारटाळण्यासाठी नागरीकांच्या हालचालींवर, बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्याकरिता मदत होणार आहे.
घोषित करण्यात आलेले मायक्रो कंटेनमेंट झोन पुढील प्रमाणे वाघोली ( वाघेश्वर सोसायटी ), शेवाळवाडी ( जि.प. शाळा परिसर ), वाघोली ( ऑझी इव्हॉल्व सोसायटी ), थेऊर ( खंडुमाळ सखरामनगर रोड व थेऊर फाटा पुनावाला स्टड फार्म ), पिसोळी ( गगण लॅव्हीश अपार्टमेंट ), न-हे ( शकुंतला बिल्डींग व दुर्वाकुर अपार्टमेंट ) किरकटवाडी( उत्सव सोसायटी ), भिलारेवाडी ( गावठाण ), केसनंद ( ऑप्टीमा हाईट्स ), कोरेगावमुळ ( ड्रीम्स निवारा १ ली विंग ), देहु ( चांदणी चौक माळवाडी व चेतन्यनगर विठ्ठलवाडी ) उपरोक्त भाग २२ जून रात्री १२ वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करणेत आला आहे. यामुळे या भागाच्या हद्दी सील करण्यात आल्या आहेत.
सदर परिसरांच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत नागरिकांना प्रवेशबंदी व घरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. यांमधून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे शासकीय कर्मचारी, पोलीस, राज्य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणा-या यंत्रणांना यांतून वगळण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तु यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात आली आहे.
या आदेशात नमूद क्षेत्रातील ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती, अति जोखमीचे आजार (मधूमेह, उच्च रक्तदाब, दमा, यकृत व मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग, HIV बाधित रुग्ण इ.) असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, वय वर्ष १० पेक्षा कमी
वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकिय कारणांशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या बँंकिंग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरु तसेच ए.टी.एम. केंद्रे पुर्णवेळ कार्यान्वित रहाणार आहेत. सदर काळात सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीतच दूध, भाजीपाला, फळे या व इतर जीवनावश्यक व अत्यावश्यक सोयीसुविधा सुरु राहतील. सदर क्षेत्रात १ किंवा २ रुग्णांचा आढळल्यास त्या परिसरातील उद्योग व औद्योगिक आस्थापना सुरु राहतील. सोसायटी मध्ये रुग्ण आढळल्यास, मायक्रो कंटेन्मेंट झोन त्या सोसायटी पुरताच मर्यादित राहिल.
सोसायटी जवळील स्वतंत्र उद्योग व औद्योगिक आस्थापना यातून वगळण्यात येत आहे. उद्योग व औद्योगिक आस्थापनेमध्ये १ किंवा २ रुग्ण आढळल्यास, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात यावी. सर्व उद्योग व आस्थापना बंद करण्यात येवू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत.