Tamil Nadu bus accident : तमिळनाडूत रविवारी सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या २ बसगाड्यांची समोरासमोर धडक झाली. त्या भीषण अपघातात ११ प्रवासी मृत्युमुखी पडले. तर, २० प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये ८ महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. जखमींपैकी काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. संबंधित अपघात शिवगंगा जिल्ह्यात घडला. चालकाचा ताबा सुटल्याने त्याच्या बसने समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयांत हलवण्यात आले. बचाव कार्यात पोलीस आणि प्रशासनाला स्थानिकांनीही मदत केली. मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी अपघातातील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी ३ लाख रूपयांची मदत जाहीर केली.