Pune District | लवळे फाटा येथे एटीएममधून 11 लाखांची चोरी

पौड, -मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथे असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीएममधून अकरा लाख रूपयांची चोरी होण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक प्रविण चिमणदास बुटाला यांनी पौड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
चौथा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बँक बंद असल्याने शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी चार वाजता 11 लाख रूपये रोकड एटीएममध्ये भरण्यात आली होती. मात्र सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान दोन अनोळखी व्यक्तीनी एटीएम मशीनचा दरवाजा चावीने उघडून ट्रे उघडण्यासाठी लागणारा सहा अंकी पासवर्ड टाकून आतील रोकड पिशवीत भरून घेऊन गेले असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
आज सोमवार (दि. 25) एटीएममधून रक्कम येत निघत नसल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा तपास पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश जाधव हे करीत आहेत.





