Satara | दहावी, बारावीची आजपासून पुरवणी परीक्षा

सातारा, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेस मंगळवार ( दि. १६) पासून प्रारंभ होत आहे. सातारा जिल्ह्यात दहावी व बारावीच्या १५ केंद्रावर परीक्षा होणार असून या परीक्षेसाठी दोन भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.
दहावी परीक्षा दि. १६ ते ३० जुलैदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी ९ केंद्रे असून परीक्षेसाठी ५२५ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. बारावीची परीक्षा दि. १६ जुलै ते ८ ऑगस्ट अखेर होणार आहे. परीक्षेसाठी जिल्ह्यात ६ केंद्रे असून या परीक्षेसाठी १ हजार २४७ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.
फलटण, पाटण, वाई, खंडाळा, खटाव, सातारा, कराड अशी प्रत्येकी १ मिळून ७ परीरक्षक कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. परीक्षेसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर व माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांची दोन भरारी पथके स्थापन केली आहेत.
परीक्षेच्या मुख्य केंद्रावर सहाय्यक परीरक्षक पूर्ण वेळ थांबून बैठे पथक म्हणून कामकाज पाहणार आहेत. सर्व केंद्रावर व उपकेंद्रावर पुरेसे फर्नीचर, इतर भौतिक सुविधा तसेच पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा आदी सोय करण्यात आल्याची माहिती प्रभावती कोळेकर यांनी दिली.





