पुणे जिल्हा | आदिवासी भागात पुन्हा 108 रुग्णसेवा

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुक्याच्या आदिवासी भागात 108 ची रुग्णसेवा मिळण्यासाठी गेली काही वर्षे आदिवासी भागातील नागरिकांची मागणी होती. यासाठी येथील किसान सभा यांच्या वतीने पाठपुरावा व दैनिक प्रभात यांच्या माध्यमातून वृत्तांकन केले होते.
त्याला यावर्षी यश आले. डेहणे प्राथमिक आरोग्य केंद्राला आदिवासी भागातील नागरिकांची तातडीच्या आरोग्य सेवेसाठी 108 ची रुग्णवाहिका शासनाकडून उपलब्ध झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे तर शासनाकडून डेहणे येथे पूर्वीपासून सुरु असलेले शासकीय हिरडा खरेदी पुन्हा सुरु करण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील डोंगरी दुर्गम आदिवासी भागात तातडीच्या सेवेसाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका नसल्यामुळे, गर्भवती महिलांना, सर्पदंश झालेल्या व्यक्तींना आणि अपघात झाल्यावर अपघातग्रस्त व्यक्तींना तातडीची आरोग्य सेवा मिळत नव्हती. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता जीव गमवावा लागला होता.
108 रुग्णवाहिका नसल्याने सर्वाधिक गर्भवती महिलांची गैरसोय होत होती. किसान सभेने आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालया समोर केलेल्या आंदोलनानंतर ही मागणी मान्य करण्यात आली होती. अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा समितीने पाठपुरावा केल्याने यश आले. डेहणे आरोग्य केंद्रानंतर्गत येणार्या खेड तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील अनेक गावांना या 108 रुग्णवाहिकेचा फायदा होणार आहे.
खेड तालुक्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात बाळ हिरडा आणि मोठा हिरडा यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. आदिवासीसह सोसायट्यांच्या माध्यमातून शासनाच्या आदिवासी विभागाकडून रास्त भावात हिरडा खरेदी होत होती.
जवळपास 35 ते 40 वर्षे डेहणे येथे आदिवासी विभागाकडून रास्त दरात हिरडा खरेदी केला जात होता; मात्र मागील काही वर्षे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने डेहणे केंद्रावर हिरडा खरेदी बंद केली होती. यासाठी पश्चिम भागातील आदिवासी नागरिकांनी व किसान सभेने संघर्ष उभा केला होता. किसान सभेच्या या संघर्षाला यश मिळाले आहे.
बाळ हिरड्याला 170 रुपये किलो हमीभाव
आदिवासी विकास विभागाने पुन्हा डेहणे केंद्रावर बाळ हिरडा खरेदी सुरू केली असून बाळ हिरड्याला 170 रुपये किलो हमीभाव जाहीर केला आहे. 108 रुग्णवाहिका व हिरडा खरेदी केंद्र याचे उद्घाटन अखिल भारतीय किसान सभा,
पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठल वनघरे, निकम मॅडम, दूध उत्पादक संघाचे संचालक लक्ष्मण तिटकारे, सुरेश कशाळे, गेनभाऊ वाजे, तुकाराम भोकटे गुरुजी, अशोक पेकारी, अशोक जोशी, अमोद गरुड, विकास भाईक, मारुती शिंदे, सखाराम जोशी, ज्ञानेश्वर भाईक, गीताराम डवणे, नवनाथ मोरे आदी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.





