पुण्यातील करोनाबधितांची संख्या हजाराजवळ आणखी 41 जणांची प्रकृती गंभीर : आरोग्य विभाग आणखी 16 जणांना मिळाला डिस्चार्ज पुणे – शहरात सलग दुसऱ्या दिवशीही करोना पॉझिटिव्ह 104 जण आढळून आले आहेत. सलग दोन दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या पुढे जात असल्यामुळे पुणेकरांची भीती वाढली आहे. त्यामुळे शहरातील बधितांची संख्या 980 झाली आहे. दरम्यान, ही संख्या केवळ पुणे शहरातील असून, त्यामध्ये ग्रामीण आणि पिंपरी महापालिकेची आकडेवारी मिळवली, तर ती हजाराच्या पुढे बाधितांची संख्या गेली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. गेल्या 24 तासांत वाढत्या बाधित रुग्णाबरोबरच चौघांचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयांत एकूण 652 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये डॉ. नायडू-100, सिम्बॉयसिस-178, भारती हॉस्पिटल- 78 यासह ससून, पूना, जहांगीर अशा एकूण विविध 22 रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यातील 41 जणांची प्रकृती गंभीर असून, यात ससून-29, भारती-4, सिम्बॉयसिस-5, तर जहांगीर, हडपसर आणि कर्वेरोड येथील सह्याद्री रुग्णालयात प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान, आजपर्यंत 146 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 6 हजार 181 जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील 5 हजार 264 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 763 जणांना विलागीकरण कक्षात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.