satara | कृष्णा बँकेचा 1033 कोटींचा एकूण व्यवसाय

कराड, (प्रतिनिधी) – 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील कृष्णा सहकारी बँकेने एक हजार 33 कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत एकूण व्यवसायात 18 टक्क्यांनी वाढ झाली असून, सलग दहाव्या वर्षी निव्वळ एनपीए शून्य टक्के राखण्यात यश मिळवल्याची माहिती बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शेतकरी, कष्टकर्यांना केंद्रबिंदू मानून सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा बँकेने गेली 53 वर्षे अव्याहत सेवा देऊन सर्वसामान्यांचे हित जपले आहे.
बँकेच्या एकूण ठेवी 683.95 कोटी रुपयांच्या असून, 350 कोटी रुपये कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय एक हजार 33 कोटी झाला असून, सीडी रेशो 51.06 टक्के आहे. एकूण भागभांडवल 803.78 कोटी, तर 98 कोटींहून अधिक स्वनिधी शिल्लक आहे. बँकेला 10.62 कोटी रुपये निव्वळ नफा झाला असून, भांडवल पर्याप्तता निधी (सीआरएआर) 20.06 टक्के आहे.
बँकेने एटीएम, एसएमएस बँकिंग, ई-कॉमर्स, आरटीजीएस, एनईएफटी, एनएसीएच यासारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू केल्या आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या जिल्ह्यांमध्ये बँकेच्या 20 शाखा व एक विस्तारीत कक्ष आहे. गेल्या आर्थिक वर्षात आगाशिवनगर (ता. कराड) आणि शिरवळ (ता. खंडाळा) येथे नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत.
या आर्थिक वर्षात कराड येथील वाखाण रोड आणि सांगली जिल्ह्यातील पलूस येथे नवीन शाखा सुरू करण्याचा मानस आहे. बँकेला मोबाइल लायसन्स मिळाल्याने, ग्राहकांना मोबाइल बँकिंगची सेवादेखील लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. बँकेच्या ठेव, कर्ज योजना आणि इतर सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अतुल भोसले यांनी केले आहे.
बँकेचा सीआरएआर 20.06 टक्के
सहकारी बँकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर म्हणजे भांडवल पर्याप्तता निधी (सीआरएआर) असतो. यातून बँकेची गुणवत्ता समजते. सीआरएआर 20 टक्के किंवा त्याहून जास्त असलेल्या बँका आर्थिकदृष्ट्या मजबूत समजल्या जातात. कृष्णा बँकेने काटकसरीने नियोजन करून, सीआरएआर 20.06 टक्के राखण्यात यश मिळवले असून, गुणवत्ता सिद्ध केली आहे.
बँकेची यशस्वी घोडदौड
एकूण ठेवी 683 कोटी 95 लाख
कर्जवाटप 350 कोटी
निव्वळ नफा 10 कोटी 62 लाख
स्वनिधी 98 कोटी 89 लाख
सीआरएआर 20.06 टक्के
ढोबळ एनपीए 4.30 टक्के
निव्वळ एनपीए शून्य टक्के





