इलेक्ट्रिक दुचाकीसाठी 10 हजार, तीन चाकी वाहनासाठी 25 हजारांचे मिळणार अनुदान

नवी दिल्ली – केंद्र सरकारने बुधवारी इलेक्ट्रिक वाहन खरेदीला चालना देण्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला. ही योजना एप्रिल पासून फक्त चार महिने चालणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या योजनेअंतर्गत दुचाकी आणि तीन चाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार्या ग्राहकांना काही प्रमाणात अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
या अगोदर अशा प्रकारची योजना चालू करण्यात आली होती. मात्र तिची मुदत 31 मार्चपर्यंत आहे. त्यानंतर पुढील चार महिने नवीन योजना लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणार्यांना दहा हजार रुपयांपर्यंतची आणि छोटे इलेक्ट्रिक तीन चाकी वाहन खरेदी करणार्यांसाठी 25 हजार रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे. या निधीतून 3.3 लाख दुचाकींना तर 41 हजार तीन चाकीना मदत उपलब्ध होऊ शकेल, असे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहन विक्रीसाठी अनुदान योजना आगामी काळात वाढविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यासंदर्भात काही बातम्या आल्या होत्या. मात्र या बातम्याचा सरकारने इन्कार केला होता. मात्र आज अचानक अवजड उद्योग मंत्रालयाने चार महिन्याच्या कालावधीसाठी पाचशे कोटी रुपये गुंतवणुकीची ही योजना जाहीर केली आहे.
मात्र ही योजना मोठ्या वाहनासाठी नाही तर छोट्या वाहनासाठी आहे. छोट्या वाहनाच्या ग्राहकाची क्रयशक्ती कमी असते. त्यामुळे मर्यादित कालासाठी या वाहनधारकांना मदत करण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याचे अवजड उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहनाची किंमत आवश्यकतेपेक्षा जास्त आहे असे बोलले जात आहे. मात्र या वाहनाची विक्री मर्यादित असल्यामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त आहे. ही विक्री वाढत गेल्यानंतर या वाहनाची किंमत कमी होऊ शकेल असे समजले जात आहे.





