पुणे -मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील संपूर्ण 531 किलोमीटार मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वार्षीक 0.733 लाख टन कार्बन उत्सर्जनात घट होणार आहे. तसेच, विद्युतीकरणामुळे 246 कोटी रुपयांची इंधन बचत होणार आहे. पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थाक इंदुराणी दुबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह, वरिष्ठ संचालकीय व्यवस्थापक स्वप्नील नीला, स्टेशन डायरेक्टर रामदास भिसे आदी उपस्थित होते. रेल्वेच्या इतिहासामध्ये मुंबई ते पुणे दरम्यान पहिल्यांदा डेक्कन क्वीन गाडी 1 जून 1930 रोजी विजेवर धावली होती. पण, त्यानंतर 2014 नंतर विद्युतीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे. भारतीय रेल्वे जागातील सर्वांत मोठी हरित रेल्वे बनविण्याचे काम सुरू आहे. 2030 पर्यंत नेट झिरो कार्बन एमिटर बनण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. दुबे म्हणाल्या, की पुणे विभागात 2014 नंतर विद्युतीकरणाच्या कामाला गती देण्यात आली. पुणे ते दौंड आणि पुढे बारामतीपर्यंत विद्युतीकरणाचे काम 2019 मध्ये पूर्ण झाले. तर, लोणंद-फलटण, पुणे कोल्हापूर विभागाचे विद्युतीकरणाचे काम 2022 मध्ये पूर्ण झाले आहे. पुणे विभागात असलेल्या 531 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. 2022-23 या वर्षात मेल एक्स्प्रेसच्या 11 गाड्या विद्युतीकरणावर बदलल्या आहेत. 2014 नंतर विद्युतीकरणाचा वेग नऊ पट वाढला आहे. यामुळे प्रदूषणामध्ये मोठी घट होणार आहे. महिन्याला 2303 लिटर इंधनबचत पुणे विभागात शताब्दी, वंदे भारत, डेक्कन क्वीन, झेलम, दुरांतो, गोवा अशा महत्वाच्या गाड्यांबरबरोबरच लोकल ट्रेन आता विद्युतीकरणावर धावत आहेत. त्यामुळे इंधनाचे बिल खूपच कमी झाले आहे. विद्युतीकरणामुळे प्रतिमहिना 2303.04 लिटर इंधनामध्ये बचत होत आहे. त्यामधून वर्षाला 0.733 लाख टन कार्बन फूटप्रिंट कमी होणार आहे.