Satara : कोयना भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी व भूकंपप्रवण क्षेत्राच्या विकासासाठी 100 कोटी निधी

कोयनानगर(विजय लाड,प्रतिनिधी) : पाटण तालुक्याचा ५५ वर्षांपूर्वी इतिहास व भूगोल बदलणाऱ्या विनाशकारी भूकंपामुळे भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. भूकंपग्रस्तांना अनेक दर्जेदार पायाभूत सुविधा मिळत नाही. भूकंपग्रस्तांच्या आदर्श पुनर्वसनासाठी व भूकंपप्रवण क्षेत्रांच्या विकास कामांसाठी राज्य शासनाने १०० कोटी रुपये निधीची तरतूद अर्थसंकल्पात करावी, असे निर्देश कोयनापुत्र असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोयना भूकंप पुनर्वसन निधी सार्वजनिक न्यासाच्या बैठकीत दिले असल्याची माहिती पालकमंत्री तथा ऊत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कोयना भूकंप पुनर्वसन निधी न्यासाची बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर , कृषीमंत्री अब्दुल सत्तार , आ.मकरंद पाटील, ऑनलाइन माध्यमातून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील, आ. शेखर निकम, संबंधित विभागाचे आधिकारी आदी प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत भूकंपप्रवण क्षेत्रातील विकासकामांसाठी निधी वाटपाबाबत ना. शंभूराज देसाई यांनी बैठकीत भूमिका मांडुन भूकंपग्रस्तांच्या पायाभूत सुविधांबाबत शासनाचे लक्ष वेधून घेतले. साडेपाच दशकांपासून भूकंपग्रस्तांची आबाळ होत असून हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी या बैठकीत केली होती.
मंत्री शंभूराज देसाई यांच्या मागणीमुळे भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसन व भूकंपप्रवण क्षेत्रातील विकासकामांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच कोयना भूकंप पुनर्वसन निधी सार्वजनिक न्यासाचे सामान्य प्रशासन विभागाकडून मदत व पुनर्वसन विभागाकडे हस्तांतरण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/alternative-to-double-decker-tunnel-for-mumbai-is-the-need-of-the-hour-chief-minister-eknath-shinde/
यामुळे भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसन आणि विकासाच्या प्रक्रियेस निश्चितच गती येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूकंपग्रस्तांच्या वेदना जाणून सकारात्मक निर्णय घेतल्याने भूंकपग्रस्तांना दिलासा मिळेल, अशा शब्दांत मंत्री शंभूराज देसाई यांनी शिंदे यांना कोयना भूकंपग्रस्तांच्यावतीने धन्यवाद व्यक्त केले.


