हॉस्पिटलच्यावतीने गुलाबपुष देऊन पुष्पांची वृष्टी
मंचर – वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उपचार घेणाऱ्या 10 बाधित करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी गुलाबपुष्प देवून अन् त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांची वृष्टी करण्यात आली.
वडगाव काशिंबेग गावचे 7 आणि फदालेवाडी गावातील 3 असे 10 बाधितांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृृष्णदेव खराडे, घोडेगावचे सहायक निरीक्षक प्रदीप पवार आदी मान्यवरांसह वडगांव काशिंबेग ग्रामपंचायतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, प्रशासकीय अधिकारी आणि भीमाशंकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीरंग फडतरे, राहुल पावडे, सचिन शिंदे आणि व्यवस्थापनाचे रुग्णांनी आभार मानले. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये सध्या नऊ करोनाबाधितांवर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे यांनी सांगितले.