RSS: ‘आरएसएस’च्या कार्यक्रमात खीर वाटप करताना चाकू हल्ला; 10 जण जखमी

जयपूर – करणी विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रजनी विहारमध्ये गुरुवारी रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शरद पौर्णिमा कार्यक्रमांतर्गत खीर वाटप सुरू असताना काही तरुणांनी चाकू हल्ला केला. चाकू हल्ल्यात दहा जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना एसएमएस हॉस्पिटलमध्ये पाठवले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रजनी विहारमध्ये आरएसएस शाखेतर्फे शरद पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, खीर वाटप करत असलेल्या लोकांवर एका तरुणाने चाकूने हल्ला करून खीर फेकली, त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. यावेळी काही लोकांनी हल्लेखोरांना पकडले. या घटनेनंतर अनेकांनी करणी विहार पोलीस ठाणे गाठून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. याप्रकरणी नसीब चौधरी आणि त्यांच्या मुलाला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड, आमदार गोपाल शर्मा, भाजप नेते अरुण चतुर्वेदी यांनी सवाई मानसिंग रुग्णालयात जखमींची भेट घेतली. रात्री उशिरा पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात करून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य तरुणांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली होती.




