पुणे | फुकट्यांकडून पावणेदहा कोटी रु. वसूल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने फुकट्या प्रवाशांवर वचक बसण्यासाठी कारवाई मोहीम हाती घेतली आहे. मागील पाच महिन्यांत (१ एप्रिल ते ३१ आॅगस्ट) विनातिकीट प्रवासी/अनियमित प्रवासी आणि बुक न केलेले साहित्य यांच्या १ लाख ४६ हजार ९४६ प्रकरणांमधून ९ कोटी ७५ लाख रुपये वसुल केले आहेत.
पुणे विभागात आॅगस्ट २०२४ मध्ये तिकीट तपासणीदरम्यान १९ हजार ९५० प्रवासी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल केला आहे.
तसेच अनियमितपणे आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या २ हजार २९९ प्रवाशांकडून ८७ लाख ८ हजार २२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच साहित्य बुक न करता घेऊन जाणाऱ्या ३३६ प्रवाशांकडून ४२ हजार ९३० रुपये दंड वसूल करण्यात आला.
पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाकडून नियमितपणे तिकीट तपासणी करण्यात आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकिट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. अन्यथा रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागू शकतो. तसेच पैसे न भरल्यास तुरुंगवासाचा शिक्षा भोगावी लागू शकते.




