Jan Dhan Yojana – केंद्र सरकार वेळोवेळी देशातील गरीब वर्गासाठी अनेक प्रकारच्या योजना आणते. प्रधानमंत्री जन धन योजना ही अशीच एक योजना आहे. जी विशेषतः दुर्बल आर्थिक विभागातील लोकांसाठी तयार करण्यात आली आहे. अलीकडेच, संसदेत पीएम जन धन खात्याबद्दल महत्त्वाची माहिती देताना सरकारने सांगितले की, या योजनेअंतर्गत देशभरात 51 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. परंतू, त्यापैकी 10 कोटींहून अधिक खाती निष्क्रिय आहेत. अशा परिस्थितीत निष्क्रिय खात्यांची संख्या एकूण खात्यांच्या 20 टक्के इतकी झाली आहे. एकूण निष्क्रिय बँक खात्यांपैकी जवळपास निम्मी खाती महिलांची असल्याची माहिती समोर आली आहे. पीएम जन धन योजना सुरू करण्यामागील सरकारचा उद्देश देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील लोकांना बँकिंग सेवेशी जोडणे हा होता. या योजनेअंतर्गत तुम्ही शून्य शिल्लक खाते उघडू शकता. या योजनेने सरकारला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वितरित करण्यात मदत केली आहे. राज्यसभेत जन धन योजनेची आकडेवारी सादर करताना वित्त राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले की, या योजनेअंतर्गत देशभरात एकूण 51.11 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. यापैकी 10 कोटी अशी खाती आहेत, ज्यात गेल्या काही वर्षांत कोणताही व्यवहार झालेला नाही. अशा स्थितीत ही खाती निष्क्रिय झाली आहेत. निष्क्रिय खात्यांमध्ये महिला खातेदारांची संख्या 4.93 कोटी आहे. या निष्क्रिय खात्यांमध्ये एकूण 12,779 कोटी रुपये जमा आहेत, ज्यासाठी कोणताही दावाकर्ता नाही.