३ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड; ५५ हजार वाहने जप्त
मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २०० घटना घडल्या. त्यात ७३२ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवार (दि. १०) रोजी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ९ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख ०१ हजार ३१६ गुन्हे नोंद झाले असून १९,५१३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८२ लाख २७ हजार ७९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लाँकडाऊनच्या काळात या १०० नंबरवर प्रचंड भडिमार झाला. ८७,८९३ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ६६० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २ लाख ५५ हजार २६६ व्यक्ती क्वारंटाईन आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ३ लाख ९८ हजार ३३८ पास देण्यात आले आहेत. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२९१ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५५,६५० वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.