संगमनेर -कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यातील संगमनेर – मालदाड – सोनोशी – नान्नज दुमाला – चिंचोली गुरव या रस्त्याच्या दुरुस्ती कामाकरता जिल्हा परिषदेच्या इतर जिल्हा मार्ग योजनेंतर्गत एक कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती इंद्रजीत थोरात व जि प सदस्य भाऊसाहेब कुटे यांनी दिली.
करोना संकटामुळे मागील तीन महिन्यात सर्व कामे थांबलेली होती. मात्र आता नव्याने मंजूर झालेल्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या भागासाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामेही काही ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या रस्ते व पूल परीक्षण योजनेंतर्गत उत्तर भागासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मालदाड, सोनोशी, नान्नज दुमाला या रस्त्याच्या कामासाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षाच्या 3054-2419 रस्ते व पूल परीक्षण अंतर्गत या चिंचोली गुरव ते मालदाड या रस्त्याच्या नवीन कामाला 1 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
या रस्त्याच्या कामामुळे या रस्त्यावरून दळणवळण करणाऱ्या देवकवठे, चिंचोली गुरव, पारेगाव बुद्रुक, काकडवाडी, नान्नज दुमाला, बिरेवाडी, पिंपळे, पारेगाव खुर्द, सोनोशी, मालदाड या गावांतील नागरिकांची सोय होणार आहे. हा रस्ता लवकरच मजबूत व डांबरीकरण होऊन कार्यान्वित होणार असल्याने उत्तरेच्या गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.