राजाळेच्या केंद्र शाळेला १ कोटी ३२ लाखांचा निधी; आदर्श शाळा पुरस्कारासह स्मार्ट शाळा प्रकल्पात समावेश

फलटण – राजाळे येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेला आदर्श शाळेच्या पुरस्कारासह स्मार्ट शाळा प्रकल्पांतर्गत १ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती सरपंच सौ. पद्मावती शेडगे यांनी दिली.
राजाळे (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे. जिल्ह्यात आदर्श झालेल्या शाळांचा स्मार्ट शाळांच्या प्रकल्पामध्ये समावेश केला असून त्याअंतर्गत या शाळेला १ कोटी २२ लाख तसेच ९.८० लाख इतक्या रकमेचा निधी प्राप्त झाला आहे. ग्रामपंचायत राजाळे आणि शालेय व्यवस्थापन समिती यांच्या अथक प्रयत्नातून शाळेत विविध विकासाचे उपक्रम राबवून तसेच इतर आवश्यक निधीचा वापर केल्यामुळे मराठी केंद्र शाळेला शासनाने आदर्श पुरस्काराने सन्मानित केले आहे.
१ कोटी २२ लाख आणि ९ लाख ८० हजारांचा निधी रुपयांचा निधी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील दि. ५ जुलैच्या आदेशातील अनुक्रमांक ११८ प्रमाणे बांधकाम विभागास वितरित केले आहेत. शाळा बांधकामाचे डिझाईन आराखडे तयार झाले असून जी+१ च्या इमारतीचे काम पुढील महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती राजाळे गावच्या विद्यमान सरपंच सौ. पद्मावती शेडगे यांनी दिली.
या कार्यास स्थानिक ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थ्यांनी देखील हातभार लावण्याचे उपसरपंच प्रेम भोईटे यांनी सांगितले. आदर्श शाळा अंतर्गत शाळेला २४×७ एक्सप्रेस पाणीपुरवठा, पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी दीड लाख रुपयाचे ॲक्वागार्डचे मशीन, बगिचा, लॉन, झाडे व झाडांना ड्रिप, परसबाग, नऊ कॉम्प्युटरची डीजिटल रूम, स्वतंत्र संगणक शिकवणारे शिक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, बोलक्या भिंती, कमिन्स कंपनीकडून खेळाचे साहित्य, बंदिस्त शाळा, पक्क्या भिंती आणि भिंतीवर तारेचे कुंपण, सुसज्ज अद्ययावत मैदान, सर्व खोल्यामध्ये पंख्यांची सुविधा आहे.





